सोलापूर डी सी सी बँक निवडणूक विशेष लेख
सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय सारीपाटावर मोहिते-पाटील आणि परिचारकांची 'गुप्त' खेळी; जयकुमार गोरेंच्या मनसुब्यांना सुरुंग लागणार?
'सोलापूरच्या धगधगत्या राजकारणात हा नेता अधिकृतपणे भाजपमध्ये असला तरी, त्यांच्या प्रत्येक राजकीय हालचाली पक्षाच्याच मुळावर घाव घालणाऱ्या ठरत आहेत. घराण्याचं कमी होत चाललेलं वर्चस्व आणि पक्षाकडून होणारी सातत्यपूर्ण कोंडी पाहता, पक्षाला खड्यासारखं बाजूला सारून आपल्या कुटुंबाच्या आणि समर्थकांच्या भक्कम पाठीशी उभे राहणारे हे नेते म्हणजे सोलापूरचे रणजितसिंह मोहिते-पाटील.
सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) निवडणुकांचे बिगुल वाजले असून, या बँकेवर भाजपचा एकहाती झेंडा फडकवण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी कंबर कसली आहे. बँक 'बिनविरोध' करण्याच्या या मोहिमेत गोरेंच्या खांद्याला खांदा लावून राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे आणि विजयकुमार देशमुख यांच्यासारखी मातब्बर मंडळी उतरली आहेत. मात्र, त्यांच्या या बिनविरोधच्या गुळगुळीत स्वप्नांना खुद्द भाजपचेच रणजितसिंह मोहिते-पाटील सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याने सोलापूरच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा गेल्या काही काळातील राजकीय प्रवास पाहिला, तर त्यांची भाजपवरील नाराजी लपून राहिलेली नाही.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते-पाटील उभे होते, तेव्हा रणजितसिंहांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना डावलून थेट भावाला साथ दिली आणि त्याला निवडूनही आणलं. पक्षाने ही मोठी चूक त्यावेळी दुर्लक्षित केली. पण त्यानंतर जेव्हा माळशिरसमधून राम सातपुते विधानसभेला उभे राहिले, तेव्हाही रणजितसिंहांनी पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. राम सातपुते यांनी तर त्यांना थेट पक्षातून काढण्याची मागणी केली, ज्याचे पडसाद म्हणून भाजपने त्यांना अधिकृतपणे कारणे दाखवा नोटीस बजावली. एवढेच नाही तर, जेव्हा सोलापूरमधून विधान परिषदेचे तिकीट कुणाला द्यायचे याची चर्चा सुरू होती, तेव्हा विद्यमान आमदार असूनही आणि स्वतःची इच्छा असूनही मोहिते-पाटील घराण्यावरील अविश्वासापोटी रणजितसिंहांना डावलण्यात आले.
तिथूनच त्यांच्या मनातील खदखद वाढत गेली आणि आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ती थेट उफाळून वर आली आहे.या सगळ्या राजकीय कोंडीवर मात करण्यासाठी आणि आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यासाठी रणजितसिंहांनी नुकतीच अकलूजच्या ऐतिहासिक 'शिवरत्न' बंगल्यावर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि जुन्या-जाणत्या मंडळींची एक मोठी बैठक बोलावली. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत रणजितसिंहांनी अत्यंत रोखठोक भूमिका मांडली.
सोलापूर जिल्ह्याची विस्कटलेली राजकीय आणि सहकाराची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपण कोणताही अहंकार न बाळकता सर्वांच्या दारात जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. बँकेचे चेअरमन असताना, बँकेकडे परवाना नसतानाही १५०३ कोटींवरून ३००० कोटींपर्यंत ठेवी नेऊन बँक ग्रामीण भागाच्या नाड्यांपर्यंत कशी पोहोचवली, याची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. विरोधक नाहक आरोप करत असले तरी सहकार टिकवण्यासाठी एकत्र येण्याची साद घालत, त्यांनी आपल्या रणनीतीची पहिली पायरी म्हणून माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी थेट पंढरपूर गाठून सोलापूरच्या राजकारणात सर्वात मोठा धक्का दिला.पंढरपूरच्या राजकारणात परिचारक कुटुंबाचे वजन आणि दबदबा किती आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सुधाकरपंत परिचारक यांनी सलग ४९ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे पुतणे आणि सध्या पंढरपूरचे भाजपचे राजकारण सांभाळणारे प्रशांत परिचारक यांनी नुकतीच बँकेसाठी मतदान करणाऱ्या ठरावधारकांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत अचानक रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी एंट्री मारली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. यानंतर परिचारक आणि मोहिते-पाटील यांनी कोणालाही आत न घेता बंद दाराआड तब्बल अर्धा ते एक तास खलबते केली. या बंद दाराआडच्या चर्चेत नेमके काय ठरले हे अद्याप बाहेर आले नसले तरी, जयकुमार गोरे यांच्या 'बिनविरोध'च्या राजकारणाला मोठा शह देण्यासाठीच ही खेळी खेळली गेल्याचे स्पष्ट आहे.
विशेष म्हणजे मोहिते-पाटील आणि परिचारक यांच्यातील हा राजकीय दोस्ताना एका ऐतिहासिक संघर्षातून उभा राहिला आहे. २००९ साली जेव्हा माळशिरस मतदारसंघ राखीव झाला, तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरपूरमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा सुधाकरपंत परिचारक आणि त्यांच्या समर्थकांनी हे पंढरपूरवरील 'अतिक्रमण' मानले, ज्यात विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला आणि या दोन मोठ्या घराण्यांमध्ये तब्बल दहा वर्षांचा राजकीय दुरावा निर्माण झाला. मात्र, काळाच्या ओघात राजकारणाचे संदर्भ बदलले, सत्तेचे केंद्र अकलूजवरून माढ्याकडे सरकले आणि मोहिते-पाटील घराण्याच्या पुढच्या पिढीचे शिलेदार म्हणून रणजितसिंहांनी हा भूतकाळ विसरून नव्या राजकारणाची सुरुवात केली. प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसाला पेढा भरवण्यापासून सुरू झालेली ही जवळीक आता थेट जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एका भक्कम राजकीय युतीत रूपांतरित होताना दिसत आहे.
एकीकडे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि बार्शीचे राजेंद्र राऊत आपापल्या तालुक्यात आणि सहकारात वर्चस्व टिकवण्यासाठी धडपडत असताना, जर पंढरपूर आणि अकलूजचे हे दोन बलाढ्य पॅटर्न एकत्र आले, तर सोलापूरच्या सहकारात एक नवीन 'समविचारी महाआघाडी' उभी राहू शकते आणि ती स्थानिक नेत्यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान देऊ शकते. आपल्या घराण्याचे राज्यावर आणि जिल्ह्यावर असलेले वर्चस्व पद्धतशीरपणे कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, हे रणजितसिंहांनी अचूक ओळखले आहे.
त्यामुळेच पक्षीय विचार न करता, कुटुंबाच्या आणि अस्तित्वाच्या लढाईला त्यांनी प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. या नव्या राजकीय समीकरणांवर प्रशांत परिचारक किंवा भाजपकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. पण आता या नव्या युतीमुळे जयकुमार गोरे आणि महायुतीच्या नेत्यांना खरंच धक्का बसणार का, आणि सोलापूर जिल्हा बँकेवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार, याचे उत्तर येणारा काळच देईल.
तुमच्या मते मोहिते-पाटील आणि परिचारक यांची ही नवी राजकीय मैत्री सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला भारी पडणार का? की जयकुमार गोरे आपला 'बिनविरोध'चा डाव यशस्वी करणार? आपले मत व्यक्त करा

