पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठलाच्या पावन नगरीतील चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसराची स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’ या उपक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी स्वतः प्रत्यक्ष सहभागी होत स्वच्छता केली.
पांडुरंगाचा वार असलेल्या बुधवारच्या दिवशी विविध संस्था, विद्यालये, समाजसेवक आणि भाविकांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, धार्मिक नगरीचे पावित्र्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जपण्याचा संदेश यामधून देण्यात येत आहे. यावेळी नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह विविध भाविक उपस्थित होते.
पंढरपूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, चंद्रभागा वाळवंट परिसराचे स्वच्छ आणि सुंदर स्वरूप टिकवून ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच भावनेतून नगराध्यक्षा सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी केवळ प्रशासनाला सूचना देण्यापुरती भूमिका न ठेवता स्वतः स्वच्छता मोहिमेत उतरून नागरिकांसमोर कृतीतून आदर्श निर्माण केला. नगराध्यक्ष कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष जनतेत उतरून काम करणारे नेतृत्व, अशी भावना यावेळी व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेणे, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि शहराच्या विकासासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे, ही प्रणिताताईंच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. पदाचा मान राखतानाच जनतेशी असलेली नाळ कायम जोडून ठेवणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि जनहिताच्या कामांना प्राधान्य देणे, या माध्यमातून त्यांनी जनसेवेप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.
जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे आणि प्रत्यक्ष कृतीतून जनसेवेचा अर्थ स्पष्ट करणारे नेतृत्व म्हणून प्रणिताताई भालके यांच्याकडे पाहिले जात आहे. स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, हा संदेश त्यांच्या सहभागातून मिळतो. स्वच्छ शहर, सुंदर पंढरपूर आणि निरोगी पर्यावरण या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नागरिकांनीही अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात येतात. त्यामुळे शहरातील धार्मिक स्थळे, नदीकाठ आणि वाळवंट परिसर स्वच्छ ठेवणे हे पंढरपूरच्या लौकिकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’ म्हणजेच स्वच्छतेच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा, या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम शहराच्या स्वच्छतेला चालना देण्याबरोबरच सामाजिक सहभाग आणि जनजागृतीसाठीही महत्त्वपूर्ण ठरत आहे.
नगराध्यक्षा सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांचा या उपक्रमातील प्रत्यक्ष सहभाग म्हणजे पदापेक्षा कर्तव्याला, प्रसिद्धीपेक्षा कृतीला आणि अधिकारापेक्षा जनसेवेला महत्त्व देणाऱ्या नेतृत्वाचे दर्शन घडविणारा ठरला आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी जोडलेले राहून जनतेच्या हितासाठी अविरत कार्य करण्याची भूमिका आणि शहराच्या स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या कार्यातून जनसेवेचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.

