कल्याण प्रतिनिधी आशा रणखांबे तेज न्यूज
कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील प्रबुद्ध भारत मेट्रो रेसिडेन्सीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नवनाथ रणखांबे आणि प्रसिद्ध बौद्ध साहित्यिक डी. एल. कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते नवनाथ रणखांबे यांनी आपल्या व्याख्यानात, “भारत बौद्धमय करण्यासाठी विविध जाती-धर्मांतील लोकांना मैत्रीच्या नात्याने जोडून त्यांच्या मनामनांत धम्म रुजविला पाहिजे. आपल्या नव्या पिढीच्या श्वासात आणि घासात भीम आणि बुद्ध पेरला पाहिजे,” असे मत व्यक्त केले. तर प्रसिद्ध बौद्ध साहित्यिक डी. एल. कांबळे यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय संस्कृतीतील बौद्ध परंपरेचे महत्त्व विशद केले.
ते म्हणाले, “या देशाची मूळ संस्कृती बौद्ध आहे. गौतम बुद्धांपूर्वी सत्तावीस बुद्ध होऊन गेले असून, गौतम बुद्ध हे अठ्ठाविसावे बुद्ध आहेत. या बुद्धांचा इतिहास विविध कथांमधून जतन झाला आहे. त्यामुळे देशातील बौद्ध संस्कृतीची परंपरा समजून घेणे महत्त्वाचे आहे. धम्मपद हा ग्रंथ माणसाला जीवन जगण्याची कला शिकवतो, तर जातक कथा माणसाला नियोजनाचे महत्त्व समजावून सांगतात.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.
यावेळी शिला भगत, सुलभा मोटघरे, निरोपा गजगे, आशा खराटे, दर्शना गायकवाड आणि आनंदा अलोने आदी उपस्थित होते. आशा रणखांबे यांनी सुमधुर धम्मगीतांचे गायन करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यानंतर उपस्थित रहिवाशांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रबुद्ध भारत मेट्रो रेसिडेन्सीच्या रहिवाशांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानंदा अहिरे, समाधान खराटे, निनाद गायकवाड, भाऊसाहेब मोटघरे, प्रतीक टेभुरणे, संजय ओंकारेश्वर, अनिल बसवंत, सुनील मेश्राम, शिवराम सोनावणे आणि धिरेंद्र मानवटकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा कामेश जाधव यांनी केले.

