नवदुर्गा - ८
संघर्षातून समृद्धीकडे: पल्लवीताईंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
लेखण - सचिन सरतापे म्हसवड
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग विचारांचा वारसा हृदयात जपत, तसेच आई-वडिलांच्या संस्कारांची शिदोरी सोबत घेऊन सौ. पल्लवी अधिकराव गायकवाड यांनी आपल्या कर्तृत्वाने एक आदर्श जीवनप्रवास घडवला आहे. मूळच्या हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील पल्लवीताईंचा जन्म १३ जुलै १९८३ रोजी १५ जणांच्या मोठ्या एकत्र कुटुंबात झाला. शेतात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या आई-वडिलांचे अथांग कष्ट आणि शिक्षक असणाऱ्या काकांच्या कडक शिस्तीत त्यांच्या बालमनावर उत्तम संस्कारांची बीजे रुजली. लहानपणापासूनच वाचनाची आवड, स्वच्छतेचा ध्यास आणि वक्तृत्वाची विलक्षण देणगी लाभलेल्या पल्लवीताईंनी शालेय वयातच भाषणांच्या स्पर्धांमध्ये नेहमीच प्रथम क्रमांकाचा चषक पटकावून आपल्या चुणूकीची जाणीव करून दिली होती.
दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर २४ मे २००० रोजी त्यांचा विवाह नेर्ली (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील अधिकराव गायकवाड यांच्याशी झाला. सासरचे एकत्र कुटुंब आणि वेल्डर म्हणून कामानिमित्त बाहेरगावी असणारे पती, अशा परिस्थितीत त्यांनी अतिशय समर्थपणे संसाराचा गाडा हाकला. लग्नानंतर प्रकृतीचे अस्वास्थ्य आणि कौटुंबिक आव्हानांची मालिका समोर ठाकली; परंतु 'संकटांशी दोन हात करणे' हीच त्यांची वृत्ती असल्याने त्या कधीही डगमगल्या नाहीत. ऋषिकेश आणि रसिका या दोन मुलांच्या जन्मानंतर, त्यांच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी त्यांनी 'विद्येचे माहेरघर' असलेल्या पुणे शहरात मुक्काम हालवला. तिथे पतीने एका छोट्या कंपनीत काम स्वीकारले आणि मुलांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. मात्र, वाढती महागाई, शहराचा खर्च आणि गावी असणाऱ्या सासू-सासऱ्यांचे वयोमान व आजारपण यांमुळे शेवटी त्यांना पुन्हा गावी परतावे लागले. गावी आल्यावर शेतीतील कामे, जनावरांचे संगोपन आणि मुलांचे पुढील शिक्षण अशी दुहेरी आव्हाने समोर होती; मात्र त्यांनी धीर न सोडता 'कष्टाचे फळ गोड असते' या उक्तीप्रमाणे सर्व परिस्थितीवर मात केली.
जीवनाच्या या खडतर वाटेवर २०१४ मध्ये त्यांनी 'उमेद' अभियानांतर्गत काम करण्यास सुरुवात केली. आरंभी मानधन तुटपुंजे असले तरी मिळालेला कामाचा अनुभव हा सोन्याहून पिवळा ठरला. दरम्यानच्या काळात लागोपाठ २ ते ३ वर्षे अंगावर आलेल्या गंभीर आजारपणामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 'अडचणीच्या काळातच आपले आणि परके कोण' याची खरी पारख होते, या अनुभवातून जात असताना पल्लवीताईंच्या पतीची खंबीर साथ आणि आई-वडिलांचे भक्कम पाठबळ हेच त्यांच्यासाठी संजीवनी ठरले.
या संकटाच्या आगीतून तावून-सुलाखून निघाल्यानंतर त्यांनी अधिक आत्मविश्वासाने सामाजिक कार्यात पाऊल ठेवले. गेल्या १० वर्षांपासून त्या महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी तळागाळात अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या या निस्वार्थी जनसेवेची दखल घेऊन त्यांची कडेगाव काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. पुढे संचालिका सविता काकडे मॅडम आणि सचिव मुनीर शिकलगार सर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी 'अग्रणी सोशल फौंडेशन, विटा' या संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजकार्याची व्याप्ती अधिक विस्तारली.
"प्रत्येक यशस्वी कार्यात कुटुंबाची भक्कम साथ हीच खरी ताकद असते," असा ठाम विश्वास बाळगणाऱ्या पल्लवीताईंनी स्वतःचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असूनही मुलांच्या आणि आता सुनांच्या उच्च शिक्षणात कोणतीही उणीव भासू दिली नाही. बॉलिवूडमधील प्रसिध्द गीतकार इंदीवर यांच्या, "कोमल है कमजोर नहीं शक्ती का नाम नारी है,जग को जीवन देनेवाली मौत भी तुझसे हारी है"
या पंक्तींचा दाखला देत त्या सर्व महिलांना स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडण्याचे व आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहन करतात. तसेच, कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या,"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी...भरलेल्या भिमेकडून तुकोबाची वाण घ्यावी.सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी."
या प्रसिद्ध ओळींप्रमाणे निसर्ग आणि अनुभवांकडून शिकत मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणे, हाच मानवी जीवनाचा खरा गाभा आहे, असे त्या मानतात.
आज 'अग्रणी सोशल फौंडेशन'च्या माध्यमातून मिळालेल्या नव्या संधीचा पूर्ण उपयोग करून महिलांच्या हक्कासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्या सदैव तत्पर आहेत. संकटांवर मात करत हसतमुखाने जगण्याची कला आत्मसात करणारा आणि समाजकार्याची तळमळ जपणारा सौ. पल्लवी गायकवाड यांचा हा जीवनप्रवास आज अनेक महिलांसाठी एक दिशादर्शक दीपस्तंभ ठरत आहे.

