सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून लायन्स क्लब झोन २ च्या वतीने उपविभागीय सभापती लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकारातून एकलपालक असलेल्या व निराधार अशा नऊ कन्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्याप्रती सन्मानाची भावना रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय सभापती लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी , लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल चे सचिव लायन दीनानाथ धुळम, आणि प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य राम ढाले , उपप्राचार्य रामेश्वर झाडे यांचीही उपस्थिती होती.
या वेळी नऊ कन्यांना टिफिन डबा, मिल्टन कंपनीची स्टील पाण्याची बाटली, वही, लेखणी आणि मोत्याची माळ अशा भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य राम ढाले प्रतिपादन करताना म्हणाले,“प्रशालेत अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि स्त्री-सन्मानाचे संस्कार रुजतात. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी माणुसकी, सहानुभूती आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.”
प्रमुख अतिथी उपविभागीय सभापती लायन प्रा. कलशेट्टी प्रतिपादन करताना म्हणाले, “नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचा गौरव करणारा उत्सव आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. स्त्रीचे महात्म्य, तिचे कर्तृत्व आणि तिचा त्याग समाजातील प्रत्येकाला माहित झाला पाहिजे. एकलपालक आणि निराधार कन्यांना सन्मान व प्रोत्साहन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कन्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.केवळ भेटवस्तू देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून,समाजातील वंचित घटकांप्रती आपुलकी,आदर आणि सहकार्याची भावना निर्माण करणे हा त्यामागील व्यापक हेतू होता.
कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा उपप्राचार्य रामेश्वर झाडे ,गणित शिक्षिका सुनीता कलशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसर्जे * यांनी केले तर आभार तुषार राठोड यांनी मानले.

