सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर सोलापूर तालुका निरीक्षक नागेश एकनाथ फाटे यांनी उत्तर सोलापूर तालुका निरीक्षक म्हणून केलेल्या संघटनात्मक कामकाजाचा कार्यअहवाल माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सादर केला.
उत्तर सोलापूर तालुका निरीक्षक म्हणून कार्यरत असताना तालुक्यातील पक्ष संघटन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय, बैठका, संघटनात्मक उपक्रम, पक्षाच्या कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी तसेच आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीसंदर्भातील नियोजन यांचा आढावा कार्यअहवालात मांडण्यात आला आहे.
सदर कार्यअहवाल पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख आणि जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याकडेही सादर करण्यात आला. यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी गावपातळीपर्यंत संघटनात्मक संपर्क वाढविणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे तसेच आगामी काळातील संघटनात्मक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यअहवाल सादरीकरणाच्या निमित्ताने उत्तर सोलापूर तालुक्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

