वाडीकुरोली (धोंडेवाडी) प्रतिनिधी स्वप्नील जमदाडे
गणेशोत्सव २०२६ निमित्त वसंतराव काळे प्रशाला, वाडीकुरोली धोंडेवाडी येथे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’चे चौथे पुष्प अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात गुंफण्यात आले.या पुष्पासाठी प्रशालेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य संजय कुलकर्णी हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले होते.
विद्यार्थ्यांनी कलागुण ओळखावे - प्राचार्य कुलकर्णी
कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही सुप्त कलागुण असतात, ते ओळखून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्याचा विकास केला पाहिजे, तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, विद्यार्थ्यांचे असणारे उपजत गुण यांना वाव देण्यासाठी प्रशालेत सहशालेय उपक्रम प्रशालेत आयोजित केले जातात असे सांगितले.असे मत त्यांनी व्यक्त केले.
वाढदिवस आणि कलाविष्काराने कार्यक्रमाला रंगत
यावेळी विचारपीठावर प्राचार्य संजय कुलकर्णी आणि पर्यवेक्षक कुमार गाजरे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीप लिंगे व कस्तुरे यांचा वाढदिवस शाळेच्या वतीने साजरा करण्यात आला. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या कविता, नृत्य आणि गाण्यांनी सर्वांची मने जिंकली. तसेच शिक्षकांमध्ये लिंगे , डोंगरे , पांढरे , लोखंडे , जमदाडे , कौलगे , खरात , बाबर , कस्तुरे यांनी आपल्या कविता आणि भावगीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते इयत्ता बारावीचा विद्यार्थी पारस काटे याने. त्याने अभिनेते नाना पाटेकर आणि हृतिक रोशन यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून उपस्थितांची वाहवा आणि टाळ्या मिळवली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन दिलीप लिंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गणपतीची शेवटची आरती डी.ए. काळे यांनी केली.
या ज्ञानवर्धक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा लाभ प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानंतर गणपती विसर्जन मोठ्या थाटामाटात करण्यात आले.


