पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हच्या तयारीच्या दृष्टीने १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास करांडे यांनी दिली.
या प्रशिक्षणाचा सुमारे १०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. अनबरसु यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये तार्किक विचारशक्ती, भाषिक कौशल्य, समस्या निराकरण कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, गणितीय अभियोग्यता
तसेच कॅम्पस प्लेसमेंट परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रश्नांचा सराव करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्लेसमेंट परीक्षेच्या पद्धतीनुसार सराव प्रश्न व मार्गदर्शन देण्यात आल्याने आगामी भरती प्रक्रियेसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली.
विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्यावर महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाकडून सातत्याने भर दिला जात आहे. उद्योगांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन अभियोग्यता, बौद्धिक क्षमता, संवाद कौशल्ये, तांत्रिक कौशल्ये, मुलाखत कौशल्ये,गटचर्चा कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास कौशल्ये यांसारख्या विविध कौशल्यविकास उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास तसेच रोजगाराच्या अधिकाधिक संधी प्राप्त करण्यास निश्चितच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांना सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयाचा ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

