कुर्डुवाडी प्रतिनिधी संतोष हलकुडे तेज न्यूज
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. या दोन संस्थांच्या वतीने जो पुरस्कार दिला जातोय त्या पुरस्कर्त्यांची निवड अत्यंत पारदर्शी पद्धतीने केलेली असून यामुळे पुरस्काराला न्याय मिळाला आहे. ‘आदर्श’ या शब्दाची निवड करताना पाहिलेली गुणवत्ता, सूक्ष्म अभ्यास, परीक्षण, निरीक्षण, उपक्रमशीलता आदी बाबी तपासल्यामुळे पुरस्काराला विशेष महत्व आहे. अशा पुरस्कारामुळे संबंधित शिक्षकांवरील जबाबदारी आणखी वाढते आणि कार्य करण्यासाठी स्फूर्ती मिळते.’ असे प्रतिपादन विद्याविकास मंडळ करमाळ्याचे सचिव प्रा. विलास घुमरे यांनी केले.
शिक्षणातील नवनवीन उपक्रमांसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व खेड (ता. उत्तर सोलापूर ) मधील एसव्हीआयटी तथा स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने माढा, बार्शी व करमाळा या तीन तालुक्यांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन कुर्डुवाडीतील ‘तुळजाई लॉन्स अँड लॉजिंग’ बार्शी नाका, करमाळा रोड याठिकाणी केले होते. याप्रसंगी विद्याविकास मंडळ करमाळ्याचे सचिव प्रा. विलास घुमरे हे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर प्रास्तविकात स्वेरीचे संस्थापक व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.बी.पी.रोंगे हे अभ्यासपूर्ण मांडणी करत होते.
ते म्हणाले ‘शासन दरबारी आपले प्रश्न व्यवस्थितपणे मांडून कशाप्रकारे ते सुटायला हवे याचा आराखडा तयार करून सादर करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी स्वेरीचे विद्यार्थी ज्याप्रमाणे करिअरमध्ये यश मिळवत आहेत त्याप्रमाणे शिक्षकांचे प्रश्न देखील अभ्यासपूर्ण धर्तीवर सोडविण्यासाठी आपण सक्षम आहोत.’ अशी ग्वाही दिली. यानिमित्ताने कुर्डुवाडीत तिन्ही तालुक्यांतील शाळेच्या व्यवस्थापन मंडळातील पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रचंड संख्येने उपस्थित होते. दोन वाजता सुरु झालेला कार्यक्रम तब्बल ५ तास चालला. यामध्ये माढा (११८), बार्शी (१२६) व करमाळा (६४) या तीन तालुक्यांत मिळून एकूण ३०८ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण’ सोहळ्यासाठी श्री. भैरवनाथ प्रतिष्ठान करमाळ्याचे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. जयप्रकाश बिले, शिवाजी शिक्षण मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार शितोळे, कुर्डुवाडीच्या श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संस्थापक डॉ. एम. पी. सुरवसे, अर्णव शिक्षण संकुल वैरागचे सचिव रविंद्र कापसे, गुरुकुल विद्यालय पांडेचे अध्यक्ष नितीन भोगे, भारत शिक्षण प्रसारक मंडळ जेऊरचे सचिव अर्जुनराव सरक, कै. शोभाताई सोपल विद्यालय घाणेगावचे शिक्षक प्रतिनिधी निवृत्ती साठे, अर्जुन खटके, भारत माने यांच्यासह इतर पदाधिकारी, माढा, बार्शी व करमाळा या तिन्ही तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी स्वेरी, पंढरपूर व एस.व्ही.आय.टी. सोलापूरच्या संयोजन समिती व तिन्ही तालुक्यातील संयोजक व सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रा. यादव पनसवाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
क्षणचित्रे-
१. प्रत्येकजण ‘आदर्श ज्ञानयात्री’ पुरस्कारासाठी फेटा बांधल्यामुळे रुबाबदार दिसत होते.
२. पुरस्कार स्वरुपात दिलेले स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ,मानपत्र व प्रमाणपत्र सह पुरस्कारार्थी आपल्या कुटुंबियांसह डॉ.रोंगे सरांसोबत छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करत होते.
३. डॉ.रोंगे सरांच्या उमेदवारीवर अनेक शिक्षक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे अनेकांनी डॉ. रोंगे सरांचा सत्कार केला.
४. उत्तम आणि स्वादिष्ट भोजनामुळे उपस्थित पुरस्कार विजेते, त्यांचे कुटुंबीय, पालक वर्ग उत्साहित झाले.

