पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली.हा कार्यक्रम मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (MESA) च्या वतीने विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनामुळे मिळणारे ज्ञान, प्रेरणा आणि व्यक्तिमत्त्व विकास याबद्दल भावना व्यक्त केल्या.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर कटेकर ,परीक्षा विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब गांधारे आणि यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत शिक्षक–विद्यार्थी संबंध, शिस्त, सातत्यपूर्ण प्रयत्न, शिक्षणातील मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षकांची भूमिका याबाबत विचार मांडले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात प्रगती साधावी, असे आवाहन ही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्याची संधी मिळाली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे व सकारात्मक नाते अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी (मेसा) MESA सदस्यांच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात आले. सर्व शिक्षक, मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम आनंददायी, भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

