भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री भवानी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविक भक्तांसह व्यापारी आणि व्यावसायिकांमध्येही उत्साह दिसून येत आहे.
यात्रेनिमित्त गावात भरणारा आठवडी बाजारही भरणार आहे. त्यामुळे व्यापारी, खेळणी विक्रेते, मिठाई विक्रेते, खाद्यपदार्थांचे गाडे लावणारे तसेच इतर व्यावसायिकांनी यात्रास्थळी आपापले व्यवसाय थाटावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने यात्रेत धनगरी ओव्या आणि गजी ढोल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या पारंपरिक लोककला स्पर्धांमुळे यात्रेच्या उत्साहात भर पडणार असून, स्थानिक लोककलेला प्रोत्साहन मिळणार आहे.
या यात्रेत व्यापारी, व्यावसायिक आणि भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन सरपंच रणजित जाधव व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


