अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आज अकलूज येथील शिवराईवाडा निवासस्थानी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मोहिते-पाटील परिवाराच्या वतीने सतेज पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. मात्र, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील विजयानंतर सतेज पाटील यांनी यापुढे ‘गोकुळ पॅटर्न’ चालणार असल्याचे म्हटल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हाच पॅटर्न सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राबविला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोकुळमधील विजयाने सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली असून, सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही वेगवेगळ्या गटांची मोट बांधली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २६ नोव्हेंबर रोजी मतदान, तर २७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील २,५९६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नव्याने ४७ दुग्ध संस्थांचा मतदार यादीत समावेश झाल्याने निवडणुकीतील समीकरणांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता यापूर्वीच्या राजकीय चर्चांमधूनही व्यक्त झाली आहे.
दरम्यान, सतेज पाटील आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या भेटीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात काही चर्चा झाली का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, गोकुळच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट आणि सोलापूर जिल्हा बँकेची सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया यामुळे राजकीय चर्चांना नक्कीच चालना मिळाली आहे.
गोकुळमध्ये यशस्वी ठरलेली रणनीती सोलापूरमध्ये वापरली जाणार का, की स्थानिक राजकीय समीकरणांनुसार स्वतंत्र डावपेच आखले जाणार, याचे उत्तर आगामी घडामोडींमधून स्पष्ट होणार आहे.

