पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग आणि युवान- युथ फॉर भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘अखंड भारत संकल्प दिवस’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
‘अखंड भारत संकल्प दिन दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी पाळला जातो. भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या बरोबर एक दिवस आधी, १९४७ मध्ये झालेल्या देशाच्या फाळणीच्या वेदनांची आठवण ठेवण्यासाठी आणि सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या भारताची अखंडता व एकता पुन्हा साधण्याचा संकल्प करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
या दिवसाला 'विभाजन विभीषिका स्मृती दिन' असेही म्हणतात. याच निमित्ताने स्वेरीमध्ये या उपक्रमाचे नियोजन स्वेरीचे संस्थापक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या प्रेरणेने तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार आणि विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक तथा प्रमुख वक्ते अभिजीत पाटील (चिपरी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘अखंड भारताची संकल्पना, राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका’ याविषयी महत्वपूर्ण संवाद साधला. शिक्षण क्षेत्रात गेली १९ वर्षे कार्यरत असलेले अभिजीत पाटील यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर प्रभावीपणे कार्य केले आहे. सध्या ते महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक म्हणून कार्यरत असून वैचारिक चिंतन व विमर्श, प्रशिक्षण कार्यशाळा, वक्ता निर्माण आदी क्षेत्रांत कार्यरत आहेत. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितिन कौटकर यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सुमारे ६०० विद्यार्थी, तसेच ‘युवान युथ फॉर भारत’ चे पंढरपूर तालुका समन्वयक यश कुलकर्णी, श्रेयश लोखंडे व त्यांचे सहकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, एकात्मता, देशभक्ती आणि राष्ट्राप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

