नवी दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र सरकारच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या योजना आणि प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामांची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नेहमीप्रमाणेच त्यांची भेट एक नवी ऊर्जा देणारी असते. विकासाच्या प्रश्नांवर त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला मिळणाऱ्या भक्कम पाठिंब्यासाठी मी त्यांचा नितांत आभारी आहे.”
महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

