मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मोहोळ न्यूजचे संपादक तथा पत्रकार विजयकुमार मोटे यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार" साठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात एप्रिल २०२० पासून बार्शी येथील साप्ताहिक कुतूहल न्यूज व यूट्यूब चॅनेलमार्फत मोहोळ व पंढरपूर प्रतिनिधी म्हणून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी स्वतःचे "मोहोळ न्यूज" हे यूट्यूब चॅनेल व ब्लॉगर संकेतस्थळ सुरू केले. या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील स्थानिक प्रश्न, सामाजिक घडामोडी, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी तसेच जनहिताच्या विविध विषयांवरील बातम्या सातत्याने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
पत्रकारितेसोबतच मराठी भाषेच्या संवर्धनासाठीही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. दैनंदिन वापरातील इंग्रजीतील "ऑनलाइन" या शब्दाला पर्याय म्हणून "आंतरजालस्पर्शी" हा मराठी प्रतिशब्द त्यांनी सुचविला असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे.
पत्रकारिता आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत पत्रकार सुरक्षा समितीने त्यांची राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

