मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि शिक्षणाची नवी उमेद जागविण्याचा सुंदर उपक्रम जॉय सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी राबविण्यात आला.
जोगेश्वरी पूर्व बांद्रेकरवाडी येथील श्रीमती लक्ष्मीबाई वळंजू प्राथमिक विद्यालय आणि श्री समर्थ माध्यमिक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात १०० गरजू विद्यार्थ्यांना किराणा किट तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वृत्त प्रकाश चे संपादक व साहित्यिक मनीष वाघ, साहित्यिक पत्रकार विनोद पितळे, मोटिव्हेशनल स्पीकर नरेंद्र गांधलीकर उपस्थित होते.
यावेळी जॉय अध्यक्ष गणेश हिरवे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हेच आयुष्य घडविणारे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगत मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर नरेंद्र गांधलीकर यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत संवादात्मक शैलीत संवाद साधत शिक्षणाचे पाच महत्त्वपूर्ण प्रकार उलगडून सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. मुलांना प्रश्न विचारत, त्यांच्याकडून उत्तरे मिळवत त्यांनी संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या भाषणात विद्यार्थी इतके रमले की, तहान-भूकही विसरून त्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाला श्री समर्थ संस्थेचे सचिव सुनील नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देसाई, सभासद मिराशी सर, जॉय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी असुंता डिसोजा, छाया राणे, शीला येरागी, मीना भूतकर, अविनाश करगुटकर, भूषण मुळे, श्रद्धा कारके आणि सुजाता नार्वेकर उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत वाडेकर, शिक्षिका सुनीता निंबाळकर यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिक्षक तळेकर सर यांनी केले.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा जॉय सामाजिक संस्थेचा हा उपक्रम समाजात संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरला. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांत सहभागी होण्याची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

