पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ओंकार ग्रुपच्या पुणे येथील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधरजी मोहोळ यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन, शेतकरी कामगार सरचिटणीस तथा माजी आमदार जयंतभाई पाटील तसेच साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य डॉ. संजय कोलते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी ओंकार ग्रुपचे संचालक प्रशांत बोत्रेपाटील, ओमराजे बोत्रेपाटील, सौ.रेखाताई बोत्रेपाटील व कु.गौरीताई बोत्रेपाटील यांची विशेष उपस्थिती होती.
मान्यवरांनी ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “शेतकरी कुटुंबातून आलेल्या बाबुराव बोत्रेपाटील यांनी अत्यंत अल्प कालावधीत साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ओंकार ग्रुपचे मोठे साम्राज्य उभे केले आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. साखर उद्योगासोबतच आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक विस्तार, शेतकरी हित आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून ओंकार ग्रुपने केलेल्या वाटचालीचे मान्यवरांनी कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी ओंकार ग्रुपमधील सर्व कारखान्यांचे जनरल मॅनेजर, खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छांमुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
ओंकार ग्रुपच्या विस्ताराच्या नव्या पर्वाची सुरुवात करणारा हा सोहळा उत्साहात व दिमाखात पार पडला.

