पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
हर घर तिरंगा अभियानांतर्गत पंढरपूर शहरात गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजता भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रभक्तीचा जागर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केले आहे.
या तिरंगा पदयात्रेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होणार असून, पदयात्रा चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती, महाद्वार चौक, कालिका देवी चौक, काळा मारुती, चौफाळा मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचणार आहे.
“तिरंगा हा केवळ ध्वज नाही, तर आपल्या राष्ट्राचा अभिमान, एकता आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे,” या भावनेतून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केले आहे.

