पटवर्धन कुरोली प्रतिनिधी तेज न्यूज
पटवर्धन कुरोली येथील पटवर्धन कुरोली प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहशिक्षक धनाजी शंकर साबळे यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळा कृती समिती, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., पंढरपूर यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी साबळे सरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
धनाजी साबळे यांनी आपल्या प्रभावी अध्यापनातून अनेक विद्यार्थ्यांना घडविले असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकासासाठीही सातत्याने मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या दीर्घकाळाच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत मिळालेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा गौरव असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर म्हणाले, “ज्या शिक्षकांनी आम्हाला घडविले, त्यांनाच सन्मानित करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
साबळे सरांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल सावंत, युवा नेते गोपाळ पाटील, गणेश देशमुख, अस्लम आतार, स्वप्निल राऊत तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

