पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी पालक मेळावा – २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाला. या मेळाव्याचा उद्देश पालक, विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यात अधिक प्रभावी संवाद निर्माण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी परस्पर सहकार्य दृढ करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात पालकांच्या वतीने श्री. जितेंद्र अंतुरकर यांची पालक समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांनी विभागाची प्रगती, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यापीठातील उल्लेखनीय यश, उद्योगाभिमुख उपक्रम, संशोधन, व्हॅल्यु एडिशन प्रोग्राम्स, औद्योगिक भेटी, प्लेसमेंट, इंटर्नशिप, विद्यार्थी उपलब्धी तसेच विभागातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात पालक व महाविद्यालय यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि संस्था यांचे संयुक्त योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले व पालकांना विद्यार्थ्यांना नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी सतत प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करताना त्यांच्या पालकांच्या योगदानाचाही सन्मान करण्यात आला. उपस्थित पालकांनी विभागाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून अशा उपक्रमांचे कौतुक केले.
या पालक मेळाव्याचे समन्वयक प्रा. ए. ए. भादुले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले. विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.
या पालक मेळाव्यामुळे पालक आणि महाविद्यालय यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक–शिक्षक–संस्था यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यास या उपक्रमाची मोलाची मदत झाली. हा उपक्रम यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धतीचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीचा उत्तम नमुना ठरला.

