NEET पेपरफुटी आंदोलनाला नैतिक विजय;
परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणांची आंदोलकांची मागणी
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोलापुरात विद्यार्थी, विविध सामाजिक व राजकीय संघटना तसेच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. NEET पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनाला हा मोठा नैतिक विजय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
युवा पॅंथर, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), बहुजन समाज पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. यावेळी “धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, नरेंद्र मोदी बाकी है”, “विद्यार्थी एकजुटीचा विजय असो” आणि “अभी तो अंगडाई है, बाकी और लड़ाई है” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
आंदोलकांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करत हा विजय देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने उभारलेल्या आंदोलनाचा परिणाम असल्याचे सांगितले.
यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले की, केवळ राजीनामा हा अंतिम टप्पा नसून देशातील परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीहिताची करण्यासाठी व्यापक सुधारणा करणे आवश्यक आहे. NEETसह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली.

