पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग मधील संगणक अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी हर्षदीप हरिदास कांबळे याची प्रतिष्ठित डेलॉईट कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. त्याला वार्षिक ६ लाख रुपयांचे आकर्षक वेतन पॅकेज मिळाले असून त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रथम वर्षापासूनच नियोजनबद्ध प्रशिक्षण दिले जाते. तांत्रिक कौशल्य विकास, प्रोग्रामिंग सराव, अभिक्षमता चाचण्या, तार्किक विचारक्षमता, इंग्रजी संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, गटचर्चा आणि मॉक इंटरव्ह्यू यांसारख्या उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. तसेच उद्योगतज्ज्ञांची व्याख्याने, करिअर मार्गदर्शन सत्रे, लाइव्ह प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप संधी आणि प्लेसमेंट-केंद्रित प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांनुसार तयार केले जाते.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा लाभ घेत हर्षदीप कांबळे याने डेलॉईटच्या निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या मार्गदर्शनामुळे त्याला कॅम्पस मुलाखतीत यश मिळाले.
डेलॉईट ही जगातील आघाडीची व्यावसायिक सेवा, सल्लागार, ऑडिट, रिस्क मॅनेजमेंट, कर सल्ला आणि तंत्रज्ञान सेवा देणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कंपनीचे जाळे १५० हून अधिक देशांमध्ये विस्तारले असून लाखो ग्राहकांना सेवा पुरवली जाते. नवोन्मेष, डिजिटल परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफीशील इंटिलिजियन्स ) आणि व्यवसाय सल्लागार क्षेत्रातील योगदानामुळे डेलॉईटला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे.
हर्षदीपच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर कटेकर डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


