पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता कर्जमाफी द्या, अशी मागणी रोहित पवारांची आहे. याच मागणीसाठी त्यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या या आंदोलनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
रोहित पवार यांच्या या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. रोहित पवार यांनी दोन दिवस पाणी देखील पिलं नाही. अखेर काल रात्री त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी रोहित पवार यांना पाणी आणि ओआरएस घेण्याचा सल्ला दिला होता. पण रोहित पवार पाणी प्यायले पण त्यांनी ओआरएस घेतलं नाही. परिणामी रोहित पवार यांची प्रकृती ढासळायला सुरुवात झाली आहे. .रोहित पवार यांच्या या अन्नत्याग आंदोलनात त्यांची प्रकृती ढासळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबिय आज पंढरपुरात दाखल झाले. रोहित पवारांच्या आई, बहीण. पत्नी आणि दोन्ही मुलं आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी रोहित पवारांचे कुटुंबिय भावूक झाले. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हे दोन दिवसांपासून आंदोलनस्थळी आहेत. ते मंचावर बसले नसले तरी ते देखील या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे.
रोहित पवारांची बीपी आणि शुगर कमी झाली
रोहित पवार यांच्या आंदोलनाला विविध स्तरावरुन पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस पक्षाने रोहित पवारांना पाठिंबा दिला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी दाखल होणार आहे. दुसरीकडे रोहित पवार यांची प्रकृती आता बिघडू लागली आहे. रोहित पवार यांची बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावण्याची विनंती केली. पण रोहित पवार यांनी सलाईन लावण्यास नकार दिला.फडणवीस सरकारमधील संकटमोटक म्हणून ख्याती असलेले मंत्री गिरीश महाजन हे आता पंढरपूरच्या दिशेला रवाना झाले आहेत. ते रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.
यावेळी ते रोहित पवार यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतील. यावेळी सरकार आणि रोहित पवार यांच्यात काय चर्चा होते? ते पाहणं महत्त्वाचं आहे. गिरीश महाजन यांच्या भेटीनंतरच आपण सलाईन लावू असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे गिरीश महाजन आणि रोहित पवारांच्या भेटीत तोडगा निघतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.


