लातूर प्रतिनिधी तेज न्यूज
वीज पडून बैल दगावल्यामुळे पत्नीला जोखडाला जुंपून शेतीची कामे करण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या काही तासांत गायकवाड कुटुंबाला नवीन बैल तसेच दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतकरी आहेत. स्वतःच्या बैलजोडीच्या सहाय्याने ते आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कसण्याचे काम करतात. मशागत, नांगरणी, पेरणी आणि वखरणी यांसारख्या विविध कामांवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
मात्र, शुक्रवारी (दि. ५ जून) झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज पडून त्यांच्या बैलजोडीतील एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे हाती घेतलेली शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी गायकवाड यांना पत्नी हौसाबाई यांनाच बैलाच्या जागी जोखडाला जुंपावे लागल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून समोर आले.
ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या समन्वयातून लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना आवश्यक त्या सर्व यंत्रणांना तत्काळ मदतीसाठी सक्रिय करण्याचे आदेश देण्यात आले.
यानंतर महसूल, पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने गायकवाड कुटुंबाशी संपर्क साधून मदत प्रक्रिया पूर्ण केली. नवीन बैल उपलब्ध करून देण्याबरोबरच मृत बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कमही मंजूर करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे काशिनाथ गायकवाड यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून आता त्यांना पत्नीला बैलाच्या जागी जोखडाला जुंपण्याची वेळ येणार नाही.



