मुबंई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) घेण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, खेड तालुक्यातील आंबये गावचे सुपुत्र प्रथम पूर्वा प्रमोद सकपाळ यांनी पहिल्याच प्रयत्नात उज्ज्वल यश संपादन केले आहे. प्रथम यांनी ६०० पैकी ४०१गुण मिळवत सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.
मूळचे आंबये (ता. खेड) येथील असलेले प्रथम सकपाळ यांचे सध्या पारसिक नगर, कळवा येथे वास्तव्य आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. सीएसारख्या अत्यंत आव्हानात्मक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळविलेले हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्रथम यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांचा, नातेवाईकांचा तसेच आंबये गावातील सकपाळ परिवाराचा आणि संपूर्ण खेड तालुक्याचा गौरव वाढला आहे. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि स्वतःची चिकाटी यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रथम यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
"परिश्रम, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते," हे प्रथम सकपाळ यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.
प्रथम प्रमोद सकपाळ यांचे या नेत्रदीपक यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


