उपक्रम दरम्यान आज पुण्यातील स्वामी आर्टच्या मिताली सुर्वे यांची ८ तासांची पोर्ट्रेट रांगोळी सेवाही स्वामीं चरणी अर्पण.
पुणे व परिसरातील स्वामी भक्तांच्या सेवाभावी कार्याबद्दल स्वामी भक्तांचा सन्मानपत्र व स्वामी कृपावस्त्र, प्रसाद देऊन चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते झाला सन्मान.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
स्वामी भक्त नितीन दिक्षीत व स्वाती दीक्षित संचलीत कोथरूड, पुणे येथील श्री स्वामी समर्थ अखंड नामसेवा या स्वामी परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणे शहर व परिसर वृद्धाश्रमातील वयोवृध्दांना मोफत अक्कलकोट दर्शन व स्वामी दर्शन घडवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे ४० वयोवृद्ध यात सहभागी होवून स्वामी दर्शन व अक्कलकोट दर्शनाचा लाभ घेतला.
या विषयी बोलताना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अखंड नामसेवा परिवाराचे हे कार्य खरोखरच स्वामी सेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी-आजोबांना स्वामींच्या दर्शनाचा लाभ उपलब्ध करून देणे हीच खरी माणुसकी आहे.श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अशा सेवाभावी उपक्रमांना नेहमीच सहकार्य करेल.
'सेवा हीच स्वामी पूजा' या भावनेतून सुरू असलेले हे कार्य असेच अखंड चालू राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुंबई येथील स्वामी आर्टच्या मिताली मिलिंद सुर्वे यांनी आपली कला-कुशलता दाखवत श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या दरबारात रांगोळीच्या माध्यमातून स्वामींना विराजमान केले. सुमारे ८ तास अखंड मेहनत घेऊन साकारलेल्या या पोर्ट्रेट रांगोळी सेवेचे भाविकांनी उभे राहून मनोभावे दर्शन घेतले. ही कला सेवा त्यांनी स्वामींच्या चरणी रुजू केली. त्यांच्या या सेवेबद्दल श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी मिताली सुर्वे यांचे विशेष कौतुक केले. यावेळी महेश इंगळे यांनी त्यांचा स्वामी कृपावस्त्र, प्रसाद व श्री स्वामी समर्थ अखंड नामसेवा परिवारचा सन्मानपत्र देऊन गौरव केला, तसेच दर्शनासाठी आलेल्या वृद्ध आजी-आजोबांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी पुणे व मुंबईत विविध क्षेत्रात उल्लेखनीय सेवाभावी कार्य करणारे स्वामी सेवेकरी अनुराधा मिलिंद पुरंदरे, गायत्री शिवराज शिंदे, विजयाताई विजय धुमाळ, सुजाताई मनोज शुक्ला,
शामलता अनिल शिर्के, कल्पनाताई वरपे संचालिका अनिकेत दिव्यांग सेवाभावी संस्था उरावडे, अनिता देवकर संचालिका शांतीबन आश्रम, भेगर बेवारस मुलांचे अनाथ आश्रम वडगाव पुणे, सुनील अनंत बोरकर, नचिकेत बबनराव घुमटकर, स्वामीकन्या कु.ईशानी अरविंद हिंगे, स्टार प्रवाह 'मी होणार महाराष्ट्राची सुपरस्टार' गायिका आकाश नागोराव हदसे, नेहा ट्रॅव्हल्स अक्कलकोट दर्शन गाडी सेवा
सेवेकरी ज्योती रवींद्र सातपुते, नरेश गोपाल पाले यांचाही देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
हे सर्व कार्य महाराजच करून घेतात. स्वामी सेवेतून व अखंड नाम सेवेच्या माध्यमातून वृद्धांना मोफत दर्शन घडवले जाते. या सेवेत स्वामी परिवाराचा हिरीरीने सहभाग असतो असे नसून सदरहू कार्य करण्यास श्री स्वामी समर्थांनी आपणांस निगरगट्ट काळीज दिले आहे. तो स्वामी सेवेच्या पुण्याईत लावल्याचे सर्वात मोठे समाधान आहे.
- स्वामी भक्त नितीन दिक्षीत, कोथरूड-पुणे

