पंढरपूर प्रतिनिधी शिवकुमार भावलेकर तेज न्यूज
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 23 जुलै 2025 रोजी पंढरपूर येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे वैश्विक दर्जाचे स्मारक करू अशी घोषणा केली होती व ती आज प्रत्यक्षात साकार होत आहे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारकाचा विषयी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, सोलापूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर विकास आराखडा जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली.
या बैठकीत पंढरपूरच्या श्री संत नामदेव महाराज स्मारकासाठी ₹९९.९९ कोटींच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. पंढरपूर येथील रेल्वेच्या ६५ एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, त्याअंतर्गत प्रस्तावित कामांना जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली.
या बैठकीस आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंढरपूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा हा आराखडा राज्य शासनाच्या विकासाभिमुख व लोकाभिमुख भूमिकेचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या महत्त्वाच्या व समस्त नामदेव भक्ताच्या अस्थेच्या असलेल्या स्मारकाच्या विषयी श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.


