पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पत्रकारांना दमदाटी करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांची संसदीय सदस्यत्वावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी ठाम मागणी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र, शाखा पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोणतीही मुभा देता कामा नये, असे सांगत पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले लोकशाहीसाठी घातक असल्याचे नमूद केले. पत्रकारांना धमकावणे, दमदाटी करणे किंवा त्यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रकार वाढत असून अशा घटनांची शासनाने गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या भावना आणि शासनाच्या कामकाजावर वस्तुनिष्ठपणे प्रकाश टाकण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असते. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे अथवा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे हे लोकशाही मूल्यांवर थेट आघात करणारे कृत्य आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केल्याची घटना अत्यंत निषेधार्ह असून त्यातून संपूर्ण पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे .
मराठी पत्रकार संघाने या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवत शासनाने या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात तसेच संबंधित खासदारांवर कायदेशीर कारवाई करून संसदीय आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या संसदीय सदस्यत्वाबाबत घटनात्मक व कायदेशीर प्रक्रियेनुसार सक्षम प्राधिकरणाकडे शिफारस करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अपराजित सर्वगोड, दत्ताराव पाटील, विनोद पोतदार, कल्याण कुलकर्णी, माऊली डांगे, अमोल माने, संतोष कसगावडे, रामकृष्ण बीडकर, कबीर देवकुळे, राजेंद्र काळे, लखन सोनवणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


