सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव, केक कापणे आणि जल्लोष एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत तो विधायक उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श पुकाळे परिवाराने पुन्हा एकदा समाजासमोर ठेवला आहे.
भावसार व्हिजन इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष सुत्रावे तसेच भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलचे सचिव सागर पुकाळे यांची कन्या कु. आराध्या सागर पुकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, सोलापूर प्रकल्प क्र. ३ अंतर्गत अक्कलकोट रोड येथील अंगणवाडी क्रमांक ४४ मधील सुमारे ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम एरिया गव्हर्नर श्रीराज निकते यांच्या हस्ते व अध्यक्ष सुशील महिंद्रकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी सागर पुकाळे यांनी भावसार व्हिजन संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत आपल्या मनोगतात सांगितले की, “समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून गेल्या सात वर्षांपासून माझ्या मुलीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात न साजरा करता त्यावरील खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरत आहोत. यावर्षी राष्ट्रीय अध्यक्ष मनीष सुत्रावे आणि कन्या आराध्या यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला आहे.”
एरिया गव्हर्नर श्रीराज निकते यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणांना सामाजिक सेवेची जोड दिल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. अशा उपक्रमांतून सर्वांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे असे म्हणत पुकाळे परिवाराचे कौतुक केले.” त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मनीष सुत्रावे व कु. आराध्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
या प्रसंगी सुशील महिंद्रकर, मल्लिनाथ याळगी, माळवतकर मॅडम, गायकवाड मॅडम, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात विशेष छाप उमटवून गेला.


