शहापुर प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
शनि. दि. २० जुन-२६रोजी सेवा समाधान फाऊंडेशन तर्फे मौ. सोगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, टिफीन बॅाक्स, खाऊ व इतर आवश्यक वस्तुंचे वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. फडकले यांनी वरील उद्गार काढले.
प्रत्येक मुल आपल्या आई वडीलांचे वारस असते. त्याचप्रमाणे ते देशाचे भावी नागरीक म्हणुन ओळखले जातात. त्यांचा भविष्याची काळजी व तरतुद पालकांबरोबर प्रत्येक समाजबांधवानी घेतली पाहीजे. तरच आपले राष्ट्र ख-या अर्थाने समृध्द भारत देश बनेल.
गेली तीन वर्षे सेवा समाधान फाऊंडेशन ट्रस्ट सातत्याने निरपेक्ष भावनेतुन अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवुन आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. याच साह्यांने अनेक गोरगरीब दुर्बल घटकांना मुख्य विकास प्रवाहात सामील होण्याची संधी मिळाली आहे, याचे आम्हांला समाधान आहे. हे यत्न यशस्वी व्हावे याकरीता आमची संस्था, पदाधिकारी व सर्व सदस्य सतत प्रयत्नशील असते आणि आम्हांला त्यांचा अभिमान आहे.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी श्री. दिपक नवाथे माजी अधिकारी रिझर्व्ह बॅंक, इतर अतिथी मध्ये श्री प्रकाश सारंग माजी बॅंक अधिकारी, सौ. स्मिता पालये व सौ. प्रज्ञा व श्री. दिलीप संभुस यांची उपस्थिती लाभली.
तसेच संस्थेचे पदाधिकारी सेक्रेटरी श्री संदीप राऊळ, खजिनदार श्रीमती मानसी मोने व समन्वयक सौ. श्रुतिका तारी श्री संजय सकपाळ युवा प्रतिनिधी कु. सदानंद राऊळ कु. मिताली मोने या सर्वानी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक मेहनत घेतली.
या कार्यक्रमांसाठी श्री नवाथे यांनी आपली पत्नी कै. सौ. वर्षा नवाथे यांच्या स्मरणार्थ भरीव देणगी दिली. त्याचप्रमाणे सौ. पालये व श्री संभुस उभयतानी ही आर्थिक मदत व भेटवस्तु दिल्या. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री फडकले यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्तविक मुख्याध्यापक श्री. शिवाजी दिनकर यांनी केले. सर्वप्रथम त्यांनी सर्वांसमोर आपल्या शाळेचा प्रगती अहवाल मांडला. तसेच त्यानी शाळेला भेडसावणारा समस्यां व वेळोवेळी त्यांचे केलेले निराकरण व विविध उपाययोंजनेची माहिती विशद केली. यासाठी ज्या दानशुरांनी मदत केली त्यांचा आवर्जुन उल्लेख करून आभार मानले.
याप्रसंगी शाळेचे असंख्य विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारांची भरीव उपस्थिती होती. या सर्वानी उत्तम सहकार्य दिले व कार्यक्रम यशस्वी केला. शिक्षिका सौ. शिवानी दिनकर यांच्या आभारप्रदर्शनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

