सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावून अवघ्या 55 दिवसांत निकाल दिल्याबद्दल समाजातील विविध स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.
या निकालाचे स्वागत करताना विधी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, "ही घटना समाजाचे सामाजिक भान हरपल्याचे आणि मानवतेला काळिमा फासणारी होती. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेला अत्याचार अत्यंत संतापजनक होता. अशा संवेदनशील आणि समाजमनाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात न्यायालयाने जलदगतीने निर्णय देऊन आरोपीला फाशीची शिक्षा सुनावणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे."
ऍड गायकवाड पुढे म्हणाले की, "अवघ्या 55 दिवसांत दिलेला हा निकाल न्यायपालिकेची कार्यक्षमता आणि पोलीस प्रशासनाच्या प्रभावी तपासाची साक्ष देणारा आहे. अशा कठोर शिक्षेमुळे भविष्यात अशा अघोरी आणि अमानुष घटनांना निश्चितच आळा बसेल. तसेच सर्वसामान्य नागरिकांचा न्यायपालिका आणि पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल."
या निर्णयाचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत होत असून, महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत जलद व कठोर न्याय मिळण्याची अपेक्षा यानिमित्ताने पुन्हा एकदा व्यक्त केली जात आहे.


