पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘इंग्लिश लर्निंग बडी प्रोग्रॅम’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन स्कूलच्या सभागृहात करण्यात आले आहे. दि. १९ एप्रिल पासून ते दि २१ जून २०२६ पर्यंत म्हणजे तब्बल १० आठवडे हा उपक्रम चालणार असून या उपक्रमात लोटसच्या विद्यार्थ्यांना अमेरिका व कॅनडा येथील विद्यार्थ्यांसोबत सहभागी होता येणार आहे. सदर उपक्रमाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम करून विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण होत असते. त्याचाच एक भाग म्हणून लोटस इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेतील प्रगती अधिक सुलभ आणि आनंददायी व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि. १९ एप्रिल पासून ते दि. २१ जून २०२६ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. प्रास्ताविकात प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी सांगितले की, 'हा उपक्रम सोबस इनसाइट फोरम (एसआयएफ) या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. सोबस ही संस्था समाजविकास आणि सक्षमीकरणासाठी काम करणारी एक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आहे. सोबस इनसाइट फोरमचे दिग्विजय चौधरी यांनी स्थापन केलेली ही संस्था पंढरपूर मधील विविध प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित करते. इंग्लिश बडी या प्रोग्रामची सुरुवात अर्जुन मल्होत्रा यांनी केली आहे जे भारतातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यापैकी एक असलेल्या एचसीएल चे माजी संस्थ्यापक आणि एसआयएफ च्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांना घरापासूनच भाषेचा सराव मिळावा यासाठी पालकांचे सहकार्य मिळवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतीशी ओळख होते आणि भविष्यातील संधीसाठी आत्मविश्वास वाढतो'. या प्रसंगी शाळेच्या वतीने स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ.हर्षवर्धन रोंगे यांनी सविस्तर माहिती दिली. याबद्दल बोलताना त्यांनी आजच्या जागतिक स्पर्धेत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे ही केवळ काळाची गरज नसून एक अनिवार्य कौशल्य झाले आहे असे सांगितले झाले आहे. हा शैक्षणिक उपक्रम हा १० आठवड्याचा आहे. यासाठी महाराष्ट्रातून २ शाळांची निवड करण्यात आली आहे.
त्यातील कासेगाव मधील लोटस इंग्लिश स्कूल ही पहिली शाळा आहे. या उपक्रमासाठी अमेरिकेमधून २३ विद्यार्थी तर कॅनडामधून १७ विद्यार्थी लोटस इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थी एकमेकांच्या सहाय्याने आणि पालकांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजीचे कौशल्य कसे वृद्धिंगत करू शकतील याचे यातून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर बहुमोल मार्गदर्शन केले. ‘इंग्लिश लर्निंग बडी प्रोग्राम’ हा केवळ अभ्यासाचा भाग नसून विद्यार्थ्यांना एकमेकांच्या सोबतीने हसत खेळत जागतिक भाषेवर प्रभुत्व मिळवून देणारा एक प्रभावी मार्ग आहे. या कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमराव रोंगे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य डॉ.महेश्वर गायकवाड, पालक प्रतिनिधी सौ.मनिषा अरकिले, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका विभूती गवस यांनी केले. शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांकडून स्वागत केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला भविष्यात मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

