मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रयत्नातून श्रीदेव गांगेश्वर मंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर.
मालवण तालुक्यातील प्रसिद्ध अशा राठिवडे गावचे जागृत ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर मंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे ग्रामस्थांनी विनंती केली होती.या विनंतीचा मान राखून जिल्हाध्यक्षांनी सरकार दरबारी प्रयत्न करून मंदिर सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला.
आणि विनाविलंब ग्रामस्थांनी दिनांक १३ एप्रिल रोजी जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामास सुरुवातही केली.
सदर मंदिराचे नूतनीकरण आणि कलशारोहणाचे महत्त्वाचे काम यापूर्वीच करण्यात आले आहे.परंतू आर्थिक परिस्थितीमुळे परिसरातील सुशोभीकरणाचे काम राहिले होते.आता १५ लाख रुपयांच्या मोलाच्या मदतीमुळे सुशोभीकरणाचे काम लवकरच पूर्णत्वास जाईल.आणि मालवण तालुक्यात एका नवीन पर्यटन स्थळाची भर पडेल अशी ग्रामस्थांकडून भावना व्यक्त केली जात आहे.या कामी समस्त गावकरी एकजुटीने कामास लागले आहेत.
या मंदिराचे वैशिष्ट्य असे की मंदिर १५-२० फूट सखल भागात असूनही मंदिरातील देवाचे पाषाण रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सहज नजरेस पडते.आणि अनाहुतपणे त्यांचे हात नमस्कारासाठी जोडले जातात.

