ठाणे प्रतिनिधी तेज न्यूज
तेजस्वी फाउंडेशनतर्फे आयोजित गौरव पुरस्कार सोहळा नुकताच ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तेजस्वी फाउंडेशन ही संस्था मागच्या दशकभरापासून सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था आहे. संस्थेचे संस्थापक प्रा प्रज्ञा पंडित आणि प्रा मनिष पंडित ठाणे, मुंबई व महाराष्ट्रातील अनेक वृद्धाश्रम, अनाथाश्रम, आदिवासी भागातील शाळा, अन्नछत्र केंद्र येथे सातत्याने अन्नदान, श्रमदान, धान्य दान, शैक्षणिक दान, वस्त्र दान आणि अशा प्रकारच्या अनेक माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य पार पाडत आहेत.
याच उपक्रमांतर्गत समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान दरवर्षी संस्थेतर्फे केले जातात. यंदाच्या या सोहळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, पु. ल. देशपांडे पुरस्कार* तसेच कुसुमाग्रज पुरस्कार प्रदान करून विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना कार्यक्रमाच्या अध्यक्षा लेखिका कवयित्री वक्त्या पूर्णिमा शिंदे, लेखक बाबुराव शिंदे, लेखक श्रीनिवास सप्रे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पुरस्कारप्राप्त मानकऱ्यांमध्ये निशा शेलार, वैशाली हजारे, चंद्रकांत गोविंद पाटील, विनोद अच्युत बांदोडकर, मिलिंद कांबळे चिंचवलकर, डॉ. आकाश वानखेडे, राजीव प्रधान, कनोजे काळूदास देवराम, संजय नागावकर, सुदाम शांताराम अहिरराव, प्रमोद नरसिंह सूर्यवंशी, अशोक कांबळे, सुदत्ता सुधीर साळवे तसेच प्रकाश लक्ष्मण पालांडे यांचा समावेश होता.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यप्रेमी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सन्मानित व्यक्तींनी आपल्या कार्यातून समाजासाठी अधिक योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रभावी व नेटके सूत्रसंचालन डिजिटल गुरु मनीष पंडित यांनी केले. त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

