पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये ‘इलेव्हेट अँड इनोव्हेट: नेक्स्ट जनरेशन टिचिंग एक्प्लोरींग इन्क्ल्युजीव्हीटी अँड डायव्हर्सीटी’ (उन्नयन आणि नवनिर्मिती: सर्वसमावेशकता व विविधतेचा वेध घेणारी आधुनिक अध्यापन पद्धती) या विषयावर दि.१० मार्च ते दि. १४ मार्च २०२६ दरम्यान पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) यशस्वीरित्या संपन्न झाला.
स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यशाळेचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या 'स्कुल ऑफ सोशल सायन्सेस' चे संचालक प्रा. गौतम कांबळे यांच्या हस्ते झाले. 'महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी'चे मिथिलेश भाकरे आणि 'पीएम-उषा' चे नोडल अधिकारी प्रा. प्रभाकर कोळेकर हे विशेष अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. प्रास्तविकात डॉ.यशपाल खेडकर यांनी समावेशक व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारी तसेच प्राध्यापकांची कार्यक्षमता वाढवण्यात आणि शिक्षणाला सातत्याने बदलणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक गरजांशी सुसंगत करण्यात अशा कार्यशाळेची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर प्रकाश टाकला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशीच्या प्रथम सत्रात मिथिलेश भाकरे यांनी आपल्या 'फाउंडेशन ऑफ इन्क्लुजिव्ह क्लासरूम्स' या प्रथम सत्राचा उद्देश हा शिक्षकांमध्ये समावेशक शिक्षणाबद्दल जागरूकता आणि समज निर्माण करण्याचा असल्याचे सांगितले. सहयोग, सहानुभूती आणि लवचिक अध्यापन पद्धतींवर भर देऊन, प्रत्येक विद्यार्थ्याला मूल्यवान, समावेशक आणि शैक्षणिक यश मिळवण्यास सक्षम वाटेल असे वर्ग तयार करण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणे, हे या सत्राचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. द्वितीय सत्रात भाकरे यांनीच ‘प्रभावी अध्यापन सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांचे स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्य यांचे महत्त्व शिक्षकांना अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यात आले. त्यांनतर 'जैवविविधता, पर्यावरण आणि शाश्वतता' या विषयावरील सत्रात नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याच्या आणि पर्यावरणीय समतोल राखण्याच्या महत्त्वाविषयी जागृती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. द्वितीय दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये डॉ. के. के. रॉय यांनी कार्यशाळेत सहभागी असलेल्या सर्व शिक्षकांना ‘मुक्स’ अंतर्गत असलेल्या सर्व ऑनलाईन कोर्सेसचे महत्व समजावून सांगून ‘प्रभावी डिजिटल अभ्यासक्रम’रचनेबाबत शिक्षकांना योग्य मार्गदर्शन केले. पुढे डिजिटल कोर्सेसच्या निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा कशाप्रकारे वापर करता येऊ शकतो? यावर मार्गदर्शन करण्यात आले. ई-सामग्रीसाठी प्रभावी पॉवर प्रेझेंटेशन तयार करण्याचे प्रात्यक्षिक सहभागी शिक्षकांना दाखविले. तृतीय दिवसाच्या सत्रामध्ये डॉ. गौरव कडलग यांनी प्रभावी अध्यापन पद्धतींना चालना देण्यासाठी, एच५पी आणि ‘पियर डेक’ सारख्या विद्यार्थी सहभाग केंद्रित साधनांवर आधारित एक प्रशिक्षण सत्र प्राध्यापकांसाठी आयोजित केले. यानंतर पुढील सत्रात उच्च शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चे वाढते महत्व जाणून घेण्यासाठी, अध्यापन आणि संशोधनातील एआय या विषयावर प्राध्यापकांसाठी एका सत्राचे आयोजन करण्यात आले होते. चौथ्या दिवसाच्या सत्रामध्ये डॉ. महेश शिंदे यांनी राष्ट्रीय शिक्षा धोरण एनईपी -२०२० याअंतर्गत मुक्त आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीवर प्रकाश टाकला. ऑनलाईन कोर्स प्लॅटफॉर्म (मुक्स) हे विविध प्रकारचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी आपले ज्ञान आणि कौशल्ये अद्ययावत करण्याचे एक लोकप्रिय माध्यम बनले असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन कोर्स (मुक्स) तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या विविध वैशिष्ट्यांचा वापर कसा करावा? यावर देखील मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर विद्यार्थी-सामग्री, शिक्षक आणि अध्यापन प्रकियेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पाचव्या दिवशी डॉ. समाधान निकुंभ यांनी मुक्त शैक्षणिक संसाधने (ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस) आणि आधुनिक शिक्षण पद्धतींमध्ये त्यांचे वाढते महत्त्व या विषयावर चर्चा केली. शैक्षणिक व्हिडिओ आणि डिजिटल आशयासाठी प्रभावी संहिता तयार करणे व ती कशाप्रकारे लिहावी यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर सहभागी शिक्षकांचे संबंधित विषयावर व्हिडिओ आणि डिजिटल आशयाचे सादरीकरण घेण्यात आले. त्यानंतर सर्व सहभागी शिक्षकांनी कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया दिली.
यावेळी सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. दिग्विजय रोंगे व प्रा. कुलदीप पुकाळे यांच्यासह स्वेरीच्या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

