मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अशोक सावंत हॉल, कांदिवली पूर्व,मुंबई येथे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटन, कला,साहित्य अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समृद्धी पर्यटन विकास सेवा ट्रस्ट,मुंबई आयोजित दिमाखदार कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मीरा रोड येथील माजी सैनिक तसेच पश्चिम रेल्वेतून मोटरमन म्हणून सेवानिवृत्त झालेले चंद्रशेखर सावंत यांना या कार्यक्रमात राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मोटरमन म्हणून कार्यरत असताना जुलै 2018 मध्ये अंधेरी येथील गोखले पूल कोसळत असताना लोकलचे इमर्जन्सी ब्रेक दाबून मोठी दुर्घटना टाळून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले होते.
तेव्हा तत्कालीन रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून चंद्रशेखर सावंत यांना कर्तव्यदक्ष मोटरमन पुरस्कार व रोख 5 लाख रुपये बक्षीस देऊन गौरव केला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी बाळासाहेब तोरसकर होते.कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रिंडलेज फार्मा चे चेअरमन रामकृष्ण कोळवणकर यांनी केले. तसेच संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अभिनेत्री व समाजसेविका मिनाक्षी पाखरे यांनी उपस्थितांचे मनापासून स्वागत केले.
बालकलाकारांनी लावणी,पोवाडा तसेच देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. हा सोहळा कला संस्कृती व समाजसेवेचा संगम घडवणारा उत्सव ठरला.

