पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक ०९/०४/२०२६ रोजी प्रशांत डगळे, सहा. पोलीस अधिक्षक (भा.पो.से) पंढरपूर विभाग, पंढरपूर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे पंढरपूर शहर हद्दीत एक बालविवाह होत असल्याचे गोपनिय बातमी मिळाल्याने निर्भया पथक पंढरपूर यांनी सदर ठिकाणी तात्काळ जावुन चौकशी केली असता सुरुवातीला मुलीचे नातेवाईकांनी मुलीचे खोटे आधारकार्ड दाखवुन तिचे वय १८ वर्षे पुर्ण असल्याचे सांगितले.
मात्र पोलीस पथकाने अधिक खोलवर चौकशी करून ती शिकत असलेल्या शाळेतुन तिचे बोनाफाईड प्रमाणपत्र मागविले असता तिचे वय हे १५ वर्षे ०३ महीने दिसुन आले. सदर अल्पवयीन मुलीचा विवाह हा पंढरपूर येथील एका २७ वर्षीय युवकासोबत होत होता. त्यानंतर तो विवाह त्याच ठिकाणी तिचे आई वडीलांनी समज देवुन रोखण्यात आला. व त्या अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती, सोलापूर यांचेसमक्ष पुढील कार्यवाहीकरीता हजर करण्यात आले.
तसेच निर्भया पथक, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, आपले हद्दीमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास आम्हास, निर्भया पथकास संपर्क करावा व यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करेल अशा लोकांवर प्रचलित कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची गय केली जाणार नाही असे सांगितले आहे.
सदरची कारवाई प्रशांत डगळे, सहा. पोलीस अधिक्षक (भा.पो.से) पंढरपूर विभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख म. पोलीस उपनिरीक्षक / सुप्रिया यादव/रावण, पोकॉ/१२३६ सावंत, पोकॉ/१३९५ कुचेकर, चापोकॉ/७२ टिंगरे, म. पोकॉ/१३११ वाघमारे यांनी पार पाडलेली आहे.

