मोहोळ प्रतिनिधी विजयकुमार मोटे तेज न्यूज
वाळूज (ता. मोहोळ) येथील मनसे अध्यक्ष रामभाऊ बुद्रुक यांची कन्या माधुरी मयूर सिरसट हिची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात पोलीस शिपाई पदासाठी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे.
माधुरीच्या या उल्लेखनीय यशामुळे तिचे माहेर वाळूज तसेच सासर यावली या दोन्ही गावांमध्ये तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
माधुरीने आपले प्राथमिक शिक्षण १ ली ते १० वी वाळूज येथे पूर्ण केले. त्यानंतर नागनाथ कॉलेज, मोहोळ येथे माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे गरड कॉलेज, मोहोळ येथे BCA पदवी प्राप्त करून तिने उच्च शिक्षण पूर्ण केले.
तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे ती अवघ्या १५ वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतरही न खचता तिने शिक्षण आणि करिअरचा मार्ग ठामपणे निवडला.
२०१८ साली यावली ता . मोहोळ येथील मयूर सिरसट यांच्याशी तिचा विवाह झाला. लग्नानंतरही तिने आपले स्वप्न जपले आणि २०२४ पासून पोलिस भरतीची तयारी सुरू केली.
तिच्या या प्रवासात सिद्धनागेश करिअर अकॅडमीचे अजित जाधव सर, शौर्य क्लासेसचे रमेश काकडे तसेच दीपस्तंभ अभ्यासिकेच्या स्वाती शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनासोबतच स्वतःच्या कठोर मेहनतीच्या बळावर तिने हे यश मिळवले.
माधुरीचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरत असून, “परिश्रम केल्याशिवाय यश नाही” याचे जिवंत उदाहरण ठरल आहे.

