अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
समाजसेवेचा खरा अर्थ कृतीतून दाखवणाऱ्या किशोर दत्तात्रय घोडके या रक्तदात्याने ५० वेळा रक्तदान करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला असून, त्याच वेळी तीन नवोदितांनी प्रथमच रक्तदान करत मानवतेच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपली. या दुहेरी आनंदाच्या क्षणाने परिसरात प्रेरणेची नवी लाट निर्माण झाली आहे.
स.म. शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी, अकलूज येथे भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज वतीने आयोजित प्रेरणादायी रक्तदान शिबिरात ५० वे रक्तदान करत किशोर लक्ष्मी दत्तात्रय घोडके या रक्तदात्याने त्यांचा लॉन्ड्री चा व्यवसाय चालवत सातत्यपूर्ण रक्तदानाच्या योगदानातून अनेकांचे प्राण वाचवण्यास हातभार लावला आहे. “रक्तदान हे केवळ कर्तव्य नसून जीवन वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे व आपण कोणाचं तरी जीवन वाचवू शकतो ह्यातच खूप मोठे समाधान आहे,” असे किशोर घोडके यांनी याप्रसंगी नम्रपणे सांगितले.
या शिबिराच्या माध्यमातून उत्कर्ष शिंदे, अक्षय लोंढे, दिग्विजय गायकवाड या तीन तरुणांनी प्रथमच रक्तदान करून समाजासाठी योगदान देण्याची सुरुवात केली. सुरुवातीला थोडी भीती आणि संभ्रम असला तरी रक्तपेढीतील डॉ. संतोष खडतरे आणि रक्तपेढीतील त्यांचे सहकारी मार्गदर्शनामुळे या तरुणांनी आत्मविश्वासाने हे पाऊल उचलले. “पहिल्यांदाच रक्तदान करताना उत्साह तर होताच परंतु थोडी भीती वाटली, पण आता खूप समाधान वाटत आहे,” असे नवोदित रक्तदात्यांनी सांगितले.
या प्रसंगी डॉ. संतोष खडतरे यांनी रक्तदानाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती ही मोठ्या प्रमाणावर आवश्यक असून रक्तदान हे पूर्णपणे सुरक्षित असून निरोगी व्यक्तीने नियमितपणे रक्तदान केल्यास त्याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. उलट, शरीरात नवीन रक्तनिर्मितीला चालना मिळते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे त्यांचे कडून आवाहन करण्यात आले.
यावेळी भक्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी एका बाजूला किशोर घोडके या अनुभवी रक्तदात्याचा आदर्श तर दुसऱ्या बाजूला तरुण नवोदितांचा उत्साह - या दोन्हींच्या संगमातून रक्तदान चळवळीला नवी ऊर्जा मिळत आहे असे सांगत अधिकाधिक युवा-युवती रक्तदानासाठी प्रेरित होवून रक्तदान करतात त्यामुळे गरजू रुग्णांना त्याचा लाभ होत आहे असे मत व्यक्त केले.यावेळी सर्व रक्तदात्यांचा तसेच किशोर घोडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी साहित्यिक चंद्रशेखर गायकवाड, अशोक साळुंखे, श्रीमंत बर्वे, आकाश मोरे, मंदाताई घोडके, अक्षय शिंदे, ओमराज कांबळे, गणेश शिर्के, ऋषिकेश काटकर, संदीप बोडरे, ऋषिराज शिंदे, कांतीलाल एकतपुरे यांचे तसेच रक्तपेढीतील कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.
एकूणच, ५० वेळा रक्तदानाचा मानाचा टप्पा आणि तीन जणांचे पहिले पाऊल - या दोन्ही घटनांनी मानवतेचा खरा अर्थ पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

