पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वस्तूंवर छापण्यात येणाऱ्या अवाजवी एमएसआरपीमुळे ग्राहकांची होत असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्यावतीने शुक्रवार दि. १२ जून रोजी तहसील कार्यालया समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ग्राहकांच्या हितसंरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. अनेक उत्पादक कंपन्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक एमएसआरपी छापत असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असून त्यांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला.
दैनंदिन वापरातील पॅकबंद खाद्यपदार्थ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू औषधे तसेच इतर उपभोग्य वस्तूंवर अवाजवी एमएसआरपी छापली जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
ग्राहक पंचायतच्यावतीने उत्पादन खर्चावर मर्यादित नफा निश्चित करून त्यानुसारच एमएसआरपी ठरविण्याचा कायदा करण्याची मागणी करण्यात आली. उत्पादन खर्चावरील नफ्याची मर्यादा २० ते ३० टक्क्यांपर्यंत ठेवण्यात
यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदनसादर करण्यात आले. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी तातडीने कायदेशीर उपाययोजना कराव्यात तसेच अवाजवी एमएसआरपीला आळा घालण्यासाठी कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा सचिव सुहस निकते, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सचिव महेश भोसले, सहसचिव आझाद अल्लापुरकर, आदी उपस्थित होते. ग्राहकांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला भविष्यात आणखी व्यापक स्वरूप देण्यात येणार असून शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.


