मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
मोहोळ तालुक्यातील देगाव (वाळूज) येथील साध्या कुटुंबातून शिक्षणाची सुरुवात केलेल्या डॉ. लक्ष्मण उद्धव नवले यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर दक्षिण कोरियात पीएचडी पूर्ण करून आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी दक्षिण कोरियातील Korea University येथे पोस्ट-डॉक्टोरल संशोधनासाठी निवड मिळवली असून ही कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.
डॉ. नवले यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देगाव येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण यशोधन विद्यालय, देगाव येथे पूर्ण झाले. पुढे त्यांनी पुण्यातील नामांकित Fergusson College मधून बी.एस्सी. पदवी घेतली आणि Savitribai Phule Pune University येथून एम.एस्सी. पदवी संपादन केली.
उच्च शिक्षणासाठी त्यांनी दक्षिण कोरियातील University of Science and Technology येथे प्रवेश घेतला. तेथे Korea Research Institute of Bioscience and Biotechnology मधून त्यांनी पीएचडी पूर्ण केली. उत्कृष्ट संशोधन कार्याबद्दल त्यांना ‘Excellence Award’ प्रदान करण्यात आला, ज्यामुळे छोट्या गावातून जागतिक संशोधन संस्थेत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास विशेष ठरला.
डॉ. नवले यांनी आतापर्यंत ४७ आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित केले असून हे निबंध Nature, American Chemical Society तसेच Royal Society of Chemistry यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
स्तनकर्करोग संशोधनात त्यांनी ATE1 हे प्रथिन कर्करोगाच्या वाढ व प्रसाराला चालना देत असल्याचा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. हे प्रथिन संभाव्य उपचारात्मक लक्ष्य ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात असून भविष्यात अधिक प्रभावी आणि लक्ष्यित उपचारपद्धती विकसित होण्यास या संशोधनाची मदत होऊ शकते.
भारतामध्ये स्तनकर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर ATE1 वर आधारित औषधनिर्मिती व लवकर निदानाच्या नव्या दिशा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी रुग्णांचे आयुर्मान वाढण्यास आणि उपचारांचे यशदर सुधारण्यास मदत होऊ शकते.
देगावच्या मातीतून जागतिक संशोधनविश्वात झेप घेणारा डॉ. लक्ष्मण नवले यांचा हा प्रवास ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून शिक्षण, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर जागतिक स्तरावर यश मिळवता येते, याचे ते जिवंत उदाहरण ठरले आहेत.

