पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाखरीतील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी छत्रपतींच्या कार्याचा व विचारांचा आदर्श पुढे ठेवून आजच्या पिढीने आपल्या आचरणात उतरवणे हीच महाराजांना खरी मानवंदना ठरेल, असे विचार व्यक्त केले. स्वराज्य, शौर्य, निष्ठा आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारे छत्रपतींचे जीवन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध कला-गुण दर्शनाचे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 'हे हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजी राजा' या नाटिकेतून छत्रपतींचे पराक्रम, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेले प्रेम प्रभावीपणे उलगडण्यात आले. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली. यानंतर छत्रपतींच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या पराक्रमावर आधारित शिवपोवाडा, दमदार शिवगर्जना तसेच भाषणांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने वातावरण भारावून टाकले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कला विभागाचे पुंडलिक अंकुशराव, संतोष देशपांडे, मराठी विभागाच्या रोहिणी गवळी, सुप्रिया अंकुशराव, संगीत विभागाचे विशाल विभुते, पूर्व प्राथमिक विभागाच्या स्वाती फडतरे व मनीषा सोनटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन गणेश कदम यांनी पार पाडले.
शिवचरित्रातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त व नागरिकत्वाची भावना जागृत करणारा एमआयटी विश्वशांती गुरुकुलचा हा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

