सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रुचाली बिराजदार हिने आपल्या गुणवत्तेच्या बळावर घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या एल.एल.बी. प्रथम सत्र (LL.B. I Semester) परीक्षेत तिने विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण महाविद्यालय परिवारात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ हे महाविद्यालयासाठी विशेष महत्त्वाचे ठरले आहे. कारण याच वर्षी महाविद्यालयाची पहिलीच बॅच सुरू झाली आणि पहिल्याच सत्रात विद्यार्थिनीने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवणे ही अत्यंत गौरवास्पद बाब ठरली. कु. रुचाली बिराजदार हिच्या या यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित झाली असून संस्थेच्या कार्याची पावती मिळाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य अॅडवोकेट पिरजादे यांनी तिच्या सत्कारप्रसंगी बोलताना सांगितले की, “रुचालीने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे हे यश शक्य झाले आहे.”
तिच्या यशाबद्दल शाहू शिक्षण संस्था चे सन्माननीय पदाधिकारी यांनीही अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागातील प्राध्यापक डॉ . तपकिरे यांच्या हस्ते कु. रुचाली बिराजदार हिचा पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यांचा योग्य संगम साधल्यास उच्च शिखरे गाठता येतात, असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयात सुरू असलेले नियमित अध्यापन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अभ्यासातील सातत्य आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन या सर्व घटकांचा या यशामध्ये मोठा वाटा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कु. रुचाली बिराजदार हिच्या या दैदिप्यमान यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून भविष्यातही महाविद्यालयातून असेच गुणवंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.हिच्या या यशामुळे स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयाची मान निश्चितच उंचावली असून तिच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
.या सत्कार प्रसंगी महाविद्यालयातील प्र.प्राचार्य देशमुख , प्रा.संतोष पाटील, प्रा. शिवाजी कांबळे, प्रा.शेख मॅडम, विधी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य पिरजादे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.


