आईच्या मायेच्या शोधात ‘पंच’ची हृदयस्पर्शी कथा…
आईची माया म्हणजे सुरक्षिततेची ऊब, प्रेमाचा स्पर्श आणि जगण्याची ताकद. पण जेव्हा हीच माया नशिबाने हिरावून घेतली, तेव्हा एका छोट्याशा जपानी मकाक पिल्लाने—‘पंच’ने—जगाला भावुक करून टाकणारी एक वेगळीच कहाणी लिहिली.
आईने नाकारल्यानंतर एकटेपणाच्या अंधारात हरवलेल्या पंचला प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी ओरंगउटानसारखं एक मऊ सॉफ्ट टॉय दिलं. त्या निर्जीव खेळण्यामध्ये त्याने आईचं प्रेम शोधलं… आणि त्याचं नाव ठेवले ‘ओरा-मम्मा’. दिवसभर त्या खेळण्याला छातीशी घट्ट धरून फिरणं, त्यालाच बिलगून शांत झोपणं—ही दृश्यं पाहताना प्रत्येकाचं मन पिळवटून जातं.
जगभरातून मिळालेलं प्रेम
पंचची कथा सोशल मीडियावर व्हायरल होताच जगभरातून प्रेमाचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी त्याच्यासाठी सॉफ्ट टॉयज पाठवले—एक छोटासा प्रयत्न, त्याच्या आयुष्यातील रिकाम्या जागेला थोडीशी ऊब देण्यासाठी. याआधी ‘पेस्टो’ आणि ‘मू डेंग’ अशी पिलं चर्चेत आली होती, पण पंचच्या डोळ्यांमधली भावनिक कहाणी लोकांच्या हृदयाला अधिक खोलवर स्पर्श करून गेली.
ही कथा फक्त एका प्राण्याची नाही… ती आहे प्रेम, जिद्द आणि भावनांची. कधी कधी आधार देणारी व्यक्ती नसली, तरी एक छोटासा स्पर्शही जगण्याची नवी आशा देऊ शकतो—हे पंचने जगाला शिकवलं आहे.

