मलकापूर प्रतिनिधी तेज न्यूज
वनपरिक्षेत्र मलकापूर आणि प्रा. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोजे पेरिड येथे 'वन वणवा जागृती सप्ताह' निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. ४ फेब्रुवारी २०२६) करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक वृंदाला वन वणवा प्रतिबंध आणि मानव-वन्यजीव संघर्ष या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मलकापूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती. उज्ज्वला शंकर मगदूम आणि वन परिमंडळ अधिकारी पांडुरंग चव्हाण (वनपाल) हे उपस्थित होते.
वन वणवा आणि वन्यजीव संरक्षणावर मार्गदर्शन
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी उज्ज्वला मगदूम यांनी जंगलाला लागणारे वणवे टाळण्यासाठी प्रत्येकाने कशी खबरदारी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आपल्या अनुभवातून वनव्याचे भीषण वास्तव आणि बिबट्यासारख्या वन्यजीवांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबद्दल चित्रफित (Video) आणि पीपीटीद्वारे सादरीकरण केले.
प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढत्या संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली. हा संघर्ष कमी करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. मानव-वन्यजीव संघर्षाची कारणे आणि तो टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यावर मोलाचे विचार मांडले.
यावेळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. मकरंद ऐतवडे यांनी वनांचे महत्त्व आणि विविध उपयुक्त वनस्पतींची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राणिशास्त्र विभागाच्या डॉ. सुरेखा रोडे यांनी केले, तर प्राणिशास्त्र विभागाचे अभिजीत माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी वनरक्षक ऋषिकेश झांजुर्न व वनरक्षक गुरुबच्चन हिप्परकर यांसह वनविभागा परिमंडळ कर्मचारी वर्ग, जलद कृती दलाचे सदस्य, महाविद्यालयाची पर्यावरण समिती, ग्रीन क्लब, एनसीसी (NCC), प्राणिशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विभागाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मलकापूर वनपरिक्षेत्र विभागाचे विशेष आवाह
जंगलाला आग लागल्यास किंवा बिबट्या तसेच इतर वन्य प्राण्यांच्या संदर्भात कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२७ (1927) वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र मलकापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

