मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सतीश रावसाहेब सावंत यांची पश्चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. दि २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले.
नियुक्तीनुसार सतीश भाऊ सावंत यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे, पात्र रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून देण्यासाठी सहकार्य करणे, तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांत मोफत उपचारासाठी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच विविध धर्मादाय ट्रस्टांच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासाठी ठाणे येथील बाळासाहेब भवन मुख्य कार्यालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संस्थापक अध्यक्ष मंगेश नरसिंह चिवटे व कार्याध्यक्ष रामहरी भिमराव राऊत यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.


