खेडभाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी, पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दि.०२/०१/२०२६ ते ०८/०१/२०२६ या सप्ताहात खेडभाळवणी, ता.पंढरपूर येथे विशेष श्रमसंस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये दि.०४/०१/२०२६ रोजी महिला आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
सदरील शिबीरासाठी पंढरपूरच्या नामवंत डॉ. संगीता पाटील, डॉ. क्षितीजा कदम-पाटील, डॉ. सचिन पवार, डॉ. तेजू पवार उपस्थित होत्या. त्यांनी खेडभाळवणी येथील शिबीरामध्ये मोफत महिलांची आरोग्य तपासणी केली. सदरील शिबीरास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ९० हून अधिक महिलांनी येऊन आपली तपासणी करुन घेतली व औषधोपचार घेतले.
निरोगी आरोग्य हीच खरी आयुष्यातील संपत्ती असल्याचे स्पष्ट मत डॉ. संगीता पाटील यांनी आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. “या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता” या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यरूपी शक्तीचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व उलगडून सांगितले. आळस, अव्यवस्थित दिनचर्या आणि अवैद्य उपचार यांमुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम, सकारात्मक विचारसरणी आणि तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.
निसर्गाशी सुसंवाद, औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि आरोग्याविषयी जागरूकता या गोष्टी केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारीही आहेत. आरोग्य जपले तरच सक्षम व्यक्ती, सशक्त समाज आणि समृद्ध राष्ट्र घडू शकते, असा आशयपूर्ण संदेश या विचारमंथनातून पुढे येतो.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, समन्वयक प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. सुमित इंगोले, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. गुरुराज इनामदार, तसेच रासयो अध्यक्ष अविराज साळुंखे, उपाध्यक्ष बिलाल शेख, सचिव राज नागणे, सहसचिव संकेत खडतरे, खजिनदार ओंकार पुजारी, सोशल मीडिया ऑपरेटर विजय पवार आणि स्वयंसेवक प्रविण नागटिळक, वैभव व्यवहारे, प्रणव जाधव, स्नेहा कदम, अमृता फुले, वैष्णवी देवकर, सानिया मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.

