पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या द्वितीय वर्ष बी.टेक.च्या विद्यार्थ्यांसाठी 'प्लॅनिंग अँड डिझाइन ऑफ बिल्डिंग्स युजिंग ऑटोकॅड' या विषयावर आधारित एक आठवड्याचा विशेष व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राम यशस्वीरित्या पार पडला.
आजच्या स्पर्धात्मक तंत्रज्ञानाच्या युगात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न ठेवता सॉफ्टवेअरमध्ये प्रगत असावे, या उद्देशाने या सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे समन्वयक आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रा. गणेश लकडे यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना ऑटोकॅड सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इमारतींचे नकाशे तयार करणे, त्यांचे नियोजन आणि डिझाइनिंग याबद्दल सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश ज. करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी आणि विभागप्रमुख डॉ. एस. एस.. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण ४६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये इमारतींच्या तांत्रिक आराखड्याबद्दलचा आत्मविश्वास वाढल्याचे पाहायला मिळाले. यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व समन्वयक प्रा. लकडे यांचे व्यवस्थापनाने कौतुक केले आहे.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की, "या एक आठवड्याच्या कार्यक्रमामुळे आम्हाला ऑटोकॅड सॉफ्टवेअरवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. अत्यंत सोप्या भाषेत इमारतींचे प्लॅनिंग आणि डिझाइन शिकविल्यामुळे आमचा तांत्रिक आत्मविश्वास वाढला आहे."
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

