देवगड प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
देवगड तालुक्यातील फणसगाव येथील महाविद्यालयात दिनांक 8 जानेवारी रोजी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग या क्षेत्रातील संधीबद्दल , विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच कोकणात उद्योजक निर्माण करण्याच्या उद्देशाने उद्योजक निर्मिती मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले . या शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला
प्रमुख मार्गदर्शक,कोकणचे सुपुत्र, आणि अनेक अधिकारी घडवणारे बदलापूर येथील ध्रुव अकॅडमी चे संस्थापक संचालक श्री महेश सावंत यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी असणाऱ्या विविध संधीची माहिती दिली . उच्च सरकारी अधिकारी होण्यासाठी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग सारख्या परीक्षांसाठी शालेय स्तरापासूनच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले . विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघणे आवश्यक आहे आणि त्यासाठी दीर्घ मेहनत, संयम आणि सोबत योग्य मार्गदर्शनाची जोड असणे आवश्यक असते. परिस्थितीशी संघर्ष करून अनेकांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून सकारात्मक प्रयत्न करा, यश मिळतेच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांसाठी फणसगाव महाविद्यालयाने राबविलेल्या या विशेष उपक्रमाचे त्यांनी याप्रसंगी कौतुक केले .
मुंबईतील उद्योजक आणि फणसगावचे सुपुत्र श्री राजेंद्र नरसाळे यांनी उच्च अधिकारी घडवणे जसे आवश्यक आहे तसेच यशस्वी उद्योजक घडवणे ही आवश्यक आहे आणि यासाठीच विद्यार्थ्यांना उद्योजक , व्यावसायिक होण्याचे आवाहन त्यांनी केले . याप्रसंगी बोलताना , उद्योजक किंवा व्यावसायिक होण्यासाठी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावर कशाप्रकारे मात करता येईल, त्याचप्रमाणे विशेषतः कोकणात उद्योग व्यवसाय करण्याच्या विविध संधी याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली. ज्यांना आपण परप्रांतीय म्हणतो ते जर कोकणात येऊन यशस्वी होत असतील,तर आपण का नाही होणार? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा असे प्रतिपादन त्यांनी केले . कोकणात उद्योजक घडवणे ही काळाची गरज आहे आणि भविष्यात आपल्यापैकी कोणालाही उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांना आम्ही नक्कीच मार्गदर्शन आणि मदत करू असे आश्वासन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिले.
संस्थेचे सचिव संदेश नारकर यांनी याप्रसंगी संस्थेकडून केल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली . अत्यंत ग्रामीण भागात , प्रतिकूल परिस्थितीत संस्थेने मोठी भरारी घेतली आहे . विद्यार्थ्यांना भविष्याच्या विविध संधींची माहिती देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे असे आश्वासन त्यांनी दिले .
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात, राष्ट्रपती पदक विजेते व फणसगावचे सुपुत्र श्री दिलीप नारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .आमच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या संधी मुलांना उपलब्ध करून दिल्या जातील , तसेच संस्थेला आमचे संपूर्ण सहकार्य व पाठिंबा मिळेल , फक्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा उचलून आपल्या गावाचे व समाजाचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
याप्रसंगी उपस्थित असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ. श्रावणी मदभावे यांनी पालकांना आवाहन करताना , लहानपणापासूनच विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक मानसिकता घडवण्यासाठी शाळेने व पालकांनी प्रयत्न करायला हवे असे मत व्यक्त केले. त्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
संस्थेचे प्राचार्य पाटील यांनी याप्रसंगी मार्गदर्शकांचे आभार मानताना अशा प्रकारचे मार्गदर्शन करणारे उपक्रम यापुढेही आम्ही आयोजित करू असे ग्रामस्थांना आश्वासन दिले.
पत्रकार गुरुनाथ तिरपणकर यांनीही याप्रसंगी शाळेच्या सदर उपक्रमाचे कौतुक करताना अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले .
या कार्यक्रमासाठी उंडील गावच्या सरपंच सौ. सरवनकर , राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिलीप नारकर - ,संस्थेचे सचिव संदेश नारकर , राहुल चव्हाण- सदस्य , प्रोफेसर जानवी नारकर ,माजी विद्यार्थिनी श्रावणी मदभावे , उदय दूधवाडकर, अध्यक्ष -तरळे पंचक्रोशी पत्रकार संघ,भाई नारकर , बाळा नर - तंटामुक्ती समिती प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

