पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राला मिळालेले वरदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने हिंदवी राज्याची निर्मिती केली. त्यांच्या जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. माँसाहेब जिजाऊ यांनी आपल्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवबाला धडे दिले. तलवारीपेक्षा लेखणी श्रेष्ठ असते. हा मोलाचा संदेश शिवाजी महाराज यांनी दिला. तलवारीच्या बळावर राज्य निर्माण करता येते. मात्र त्या राज्याची व्यवस्था ही योग्य लेखणीच्या माध्यमातूनच करता येते.’असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा. डॉ. अरुण घोडके यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त इतिहास विभाग व प्राचीन इतिहास व संस्कृती विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. भगवान नाईक नवरे हे होते. यावेळी मंचावर अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. समाधान माने आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. अरुण घोडके म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गड आणि किल्ल्यांची निर्मिती केली. या गड किल्ल्यांना अभेद्य ठेवणारी माणसे मिळवली. निस्वार्थी आणि धाडसी माणसे निर्माण केल्यामुळेच स्वराज्य निर्माण करता आले. विद्यार्थ्यांनी शिवचरित्र अभ्यासले पाहिजे. चांगली चरित्रे वाचल्या शिवाय चारित्र्य घडत नाही. म्हणून इतिहासातून बोध घ्यावा.’
अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध पैलू आपण समजून घेतले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी शिव छत्रपती चरित्रांचे चिंतन करावे.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचीन इतिहास विभागप्रमुख डॉ. गोवर्धन दिकोंडा यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके यांनी केले. या कार्यक्रमात इतिहास विषयातून पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल प्रा. डॉ. सुवर्णा हजारे-डांगे यांचा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.
समारंभ समितीच्या वतीने माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास समारंभ समिती प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे, प्रा. डॉ. उमेश साळुंखे, प्रा. सुमन केंद्रे, प्रा. कल्याण वाटाणे, प्रा. बाळासाहेब गायकवाड, प्रा. विनोद आखाडे आदी प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी इतिहास विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

